मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत गावकऱ्यांनी घेतली शपथ; घेतला 'हा' मोठा निर्णय
कमलाकर बिरादार, नांदेड
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
यातच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील गावकऱ्यांनी शपथ घेतली आहे.
कुठल्याही राजकीय पक्षांच्या प्रचार, बैठक किंवा सभेला न जाण्याची भूमिका लोणी खुर्द येथील गावकऱ्यांनी घेतली असून तशी शपथच या गावकऱ्यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील जो राजकीय निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.