Sanjay Upadhyay: बोरिवलीमध्ये बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी नाट्य
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे.
बोरिवली मतदार संघातून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे स्थानिक नेते नाराज झाले असल्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, गणेश खणकर, प्रविण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सातत्याने आयात उमेदवारांमुळे भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बोरीवलीतील भाजपचे स्थानिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बाहेरचा उमेदवार नको म्हणत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. भाजप कार्यकर्त्यांचा संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवारालाच संधी देण्याची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या(मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आणि नाराजी नाट्य पाहता भाजप काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.