राज ठाकरे बॅकफूटवर? शिवाजी पार्क ठाकरेंना की शिंदेना?
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यातच शिवाजी पार्क मैदानावर 17 तारखेला कुणाची सभा होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे MIG क्लब येथे जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी शिवाजी पार्क मैदानावरील सभेबाबत राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, माझी 17 तारखेला शिवाजी पार्कवरची सभा आहे, ती आहे म्हणताना आता मला होती म्हणावी लागेल. याचे कारण अजून माझ्याकडे परवानगी आलेली नाही.
सरकारकडून जी परवानगी यावी लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाही. त्यामुळे माझ्याकडे फक्त दीड दिवस त्या सभेसाठी उरलेला आहे. या दीड दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत. त्याच्याऐवजी मी माझा मुंबई, ठाणे आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघामध्ये माझा दौरा होणार आहे. असे राज ठाकरे म्हणाले.