मनसेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव-सूत्र
विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत मोठी बातमी समोर आली आहे. स्वबळाचा नारा दिलेल्या मनसेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिवसेनेने दहा जागांवर आपला उमेदवार देऊ नये असा मनसेचा प्रस्ताव असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. वरळी, शिवडी, माहिम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशीभांडुप, विक्रोळी, कल्याण या जागांचा प्रस्ताव असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता त्या बदल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रस्तावानुसार उमेदवार देतात का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
माहिम मतदारसंघावरून पेच कायम
माहिममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. माहिममध्ये अमित ठाकरे यांना महायुतीने पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. 2009 सालापासून सदा सरवणकर यांचा गड असलेल्या मतदारसंघात अमित ठाकरे यांनी अर्ज भरल्यामुळे आता पेच पाहायला मिळत आहे. मनसे विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर निवडणूक लढणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.