"उमेदवारी अर्ज भरण्याबाबत प्रशिक्षण द्या," उच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगाला सूचना
निवडणूक लढवण्यास अनेकजण इच्छुक असतात. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना राहिलेल्या त्रुटींमुळे त्यांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटाळले जातात. परिणामी, अशा इच्छुक उमेदवारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका केल्या जातात. या सगळ्यांचा विचार करता उमेदवारी अर्ज भरण्याबाबत प्रशिक्षण देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) निवडणुकीसाठीचा नामांकन अर्ज कसा भरावा याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या चित्रफिती तयार करून त्या प्रसिद्ध कराव्यात, अशी सूचनाही न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने केली. त्याचवेळी, राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या पाच इच्छुक उमेदवारांच्या याचिका फेटाळून त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
याचिकांमध्ये केलेल्या मागणीचा विचार करता आणि नामनिर्देशन अर्ज नाकारण्याचा निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय चुकीचा असल्याचे योग्य मानले, तरी निवडणुकीच्या या टप्प्यावर याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला जाऊ शकत नाही. असा दिलासा दिल्यास ते निवडणुकीच्या वेळापत्रकात व्यत्यय आणण्यासारखे ठरेल आणि वेळापत्रक विस्कळीत होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.