Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड
महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासाठी ही निवडणूक म्हणजे अग्निपरिक्षा होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष फुटीनंतर जनतेचा आशीर्वाद मिळतो का याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. निकालानंतर चित्र स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीतील घटक पक्षांनी ठिकठिकाणी ढोलताशाच्या गजरात मिरवणुका काढून आनंदोस्तव साजरा केला.
थोडक्यात
शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड
शिंदेंच्या उपस्थितीत ताज लॅण्ड्स एण्डमध्ये बैठक
आमदार प्रताप सरनाईक अनुमोदकपदी
विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये शिवसेना आमदार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंत्री उदय सामंत यांनी हा प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावावर शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी सहमती दर्शवली. आमदार प्रताप सरनाईक अनुमोदकपदी निवड करण्यात आली. शिंदेंच्या उपस्थितीत ताज लॅँण्ड्स एण्डमध्ये बैठक सुरु आहे. बैठकीत नवनिर्वाचित आमदारांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.
महायुतीने तब्बल २३० जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीमध्ये भाजपाला १३०, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १४ जागा जिंकल्या आहेत.