"काहीच करायचे नाही असं मावळत्या आमदारांचं धोरण," डॉ. अर्चना पाटील यांचा अमित देशमुखांवर हल्लाबोल
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातुरात यंदा भाजपकडून तगडं आव्हान देण्यात आलं आहे. भाजपकडून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील अमित देशमुखांना आव्हान देणार आहेत. डॉ. अर्चना पाटील यांनी अमित देशमुखांवर हल्लाबोल केला आहे.
"आपल्या महायुती सरकारने लातूरच्या शासकीय रुग्णालयासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. पण लातूरच्या लोकप्रतिनिधींनी त्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही. गोरगरीब रुणांना कितीही त्रास झाला तरी त्यांच्यासाठी काहीच करायचे नाही, असे धोरण मावळत्या आमदारांनी राबवल्याने एकंदर परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी आता सत्ता बदल आवश्यक आहे." असे लातूर शहर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
थोडक्यात
महायुती सरकारने लातूरच्या शासकीय रुग्णालयासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता.
लातूरच्या लोकप्रतिनिधींनी त्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही.
गोरगरीब रुणांना कितीही त्रास झाला तरी त्यांच्यासाठी काहीच करायचे नाही.
काहीच करायचे नाही असे मावळत्या आमदारांचे धोरण
डॉ. अर्चना पाटील यांचा अमित देशमुखांवर गंभीर आरोप
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे: केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचं आवाहन
"लातूर शहर मतदार संघातील सर्व समस्या - अडचणींची सोडवणूक करण्यासाठी मतदारांनी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे," असे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आवाहन केले. "देशाच्या सर्वांगिण विकासासाठी देशात मोदी सरकार आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार आवश्यक आहे.
महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी वेगवेगळे उद्योगधंदे , रेल्वेलाईन, विमानसेवा आदी सुविधा सुरू करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराचा विचार करा," असेही त्यांनी यावेळी सांगितले.
"लातुरातील मतदारांनी या निवडणुकीत डॉ. अर्चना पाटील यांना विजयी करून मतदार संघातून जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे" असे आवाहन भाजप नेते अरविंद मेनन यांनीही केले आहे. तर राज्यात सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. व्यंकटराव बेद्रे यांनीही यावेळी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.