मरीन ड्राईव्ह ते विरार प्रवास 35 ते 40 मिनिटांत शक्य होणार: देवेंद्र फडणवीसांची घोषणा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचारसभा सुरु आहेत. प्रचारसभांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महत्त्वाची घोषणा केली आहे. यावेळी कोस्टल रोडचा विरारपर्यंत विस्तार करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
थोडक्यात
कोस्टल रोडचा विरारपर्यंत विस्तार
'मरीन ड्राईव्ह ते विरार 35 ते 40 मिनिटांत होणार
प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मुंबई आणि नवी मुंबई रस्ते मार्गाने प्रवास करणे मोठे दिव्यच असते. सध्या या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा वेळ जातो. परंतु राज्यात समृद्धी महामार्ग साकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन भागांना जलदगतीने मार्गाने जोडण्याचा प्लॅन सांगितला. नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत होणार असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी नवी मुंबईतील प्रचार सभेत बोलताना सांगितले. ‘कोस्टल रोड’ चा विस्तार भाईंदर, विरार, पालघरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी जपान सरकार 40 हजार कोटी कर्ज देणार आहे, असे फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.
काय म्हणाले फडणवीस?
नरीमन पॉईंट ते विरार प्रवास ४० मिनिटांत करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु होत आहे. त्यासाठी जपान सरकारकडून ५४ हजार कोटी मिळणार आहेत. तसेच नवी मुंबईत वाढवण बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे. नवीन रस्ते होत आहे. आता या ठिकाणी विमानतळ आले तर या भागाचे चित्र बदलणार आहे. या विमानतळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे जाहीर केले. या ठिकाणी होणाऱ्या वाढवण बंदरामुळे कोळी बंधू समृद्ध होतील. नरेंद्र मोदी यांनी निल क्रांती योजना आणली. त्यामुळे कोळी बांधवांना कर्ज मिळू लागले. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात बदल होऊ लागले, असे फडणवीस यांनी सांगितले.