निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते अर्ज दाखल करणार असून अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यावेळी वागळे इस्टेट, मॉडेला चेकनाका येथील दत्त मंदिर ते किसन नगर आयटीआय इमारतीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला उमेदवारी अर्ज भरताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण परिवार उपस्थित राहणार आहे.