Rahul Narwekar: कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर विजयी
कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. राहुल नार्वेकरांना 81085 मते मिळाली आहेत. राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे हिरा देवासी यांच्यात ही लढत होती. हिरा देवासी यांना 32504 मते मिळाली आहेत.
कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. मुंबईतील हा महत्त्वाचा एक मतदारसंघ आहे. २००८ मध्ये केलल्या मतदारसंघांच्या रचनेनंतर त्याची निर्मिती झाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा पराभव केला होता. राहुल नार्वेकर यांच्या आधी भाजपचे राज पुरोहित येथून आमदार होते.
कोण आहेत राहुल नार्वेकर?
45 वर्षीय राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलं. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत असत. पुढे राहुल नार्वेकर यांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही इंग्रजी टीव्ही चॅनलवर पाठवलं जाऊ लागलं.
राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, "राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते." राहुल नार्वेकर यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून येत असत. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत.
लोकसभा निवडणुकीत पराभूत
राहुल नार्वेकर यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं गेलं.
भाजपकडून विधानसभेत
पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. अशा प्रकारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपमध्ये ते स्थिरावले आहेत.
नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं, "राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते,आता भाजप मध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे."
कुलाब्यातील राजकीय समीकरण?
कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते राज पुरोहित यांचा आधीपासून चांगला दबदबा राहिलाय. २००९ मध्ये राज पुरोहित यांचा येथून पराभव झाला होता. पण २०१४ मध्ये त्यांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ मध्ये राज पुरोहित यांचा पत्ता कापत भाजपने राहुल नार्वेकर यांना येथून उमेदवारी दिली होती. ज्यामध्ये ते विजयी झाले होते. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून विद्यामान आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.