Pune : सहा वर्षीय शौर्य दामलेनी गाठला एव्हरेस्ट बेस कॅम्प
दिवाळीसणात फटाके, फराळ, नवीन कपडे हे लहान मुलांचे आकर्षण असते. पण या गोष्टींना बाजूला ठेवून पुणे मधील कोथरूड येथे राहणारे रहिवाशी संस्कार आणि सायली दामले यांचा सुपुत्र शौर्य दामले (वय वर्ष ६) याने आपली जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील अतिशय खडतर असा एव्हरेस्ट बेस कॅम्प सोमवारी, दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी वडिलांसोबत यशस्वीरीत्या गौरवास्पद कामगिरी पूर्ण केली.
समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीचा हा एव्हरेस्ट बेस कॅम्प जिथे वर्षभर सर्वत्र बर्फ असतो. साधारणपणे उणे १५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान असते.
नेपाळच्या काठमांडू पासून रामेचाप, लुक्ला, फाकडींग, नामचे बजार, तेंगबोचे, देबोचे, फेरीचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरखशेप असे खडतर गिर्यारोहण मजल दरमजल करीत कुठलाही त्रास न होता एव्हरेस्ट बेस कॅम्प शौर्यने यशस्वीरीत्या पार केला.
समुद्रसपाटीपासून जसे जसे उंचीवर जातो तसतशी हवा विरळ होऊन ऑक्सिजनचे प्रमाण खुप कमी व्हायला लागते आणि प्रत्येक पाऊल टाकताना दम लागतो. उलटी होणे, चक्कर येणे, दम लागणे, डोकेदुखी असे अनेकांना अनुभव येतात. अशा वातावरणात शौर्यने हि कामगिरी बर्फात हसत खेळत आनंदरीत्या पूर्ण केली. १४ दिवसांची हि मोहीम फत्ते करून त्याने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा मोठ्या दिमाखात फडकवला.