मुंडे बहिण-भावात रंगली जुगलबंदी; राजकीय शत्रू एकाच व्यासपीठावर
विकास माने : बीड | परळीच्या जनतेनं सोमवारी एक ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवलाय. राजकीय शत्रू असलेले मुंडे बहिण-भाऊ हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होतं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्काराचे. यापूर्वी देखील दोघे मुंडे बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले होते. सोमवारी या कार्यक्रमानिमित्त दोघांचीही एकाच व्यासपीठावर चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली.
अहमदाबाद येथे पार पडलेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीतील श्रद्धा गायकवाड हिने सुवर्णपदक पटकावले आहे. यानिमित्ताने नागरी सत्कार करण्यासाठी परळीकरांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हे दोघे बहिण भाऊ एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.
श्रद्धा गायकवाड हिला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून पंकजा मुंडे यांनी आर्थिक मदत केली आहे. त्यावेळी हवे त्यावेळेस सांग असे पंकजा मुंडे यांनी श्रद्धाला सांगितले. यावेळी ब्लँक चेक गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून श्रद्धाला देण्यात आला. दरम्यान यानंतर झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी श्रद्धा गायकवाडला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, माझ्या बहिणीने ब्लँक चेक दिला असला तरी तो मी बाऊन्स होऊ देणार नाही, असा शाब्दिक चिमटा धनंजय मुंडेंनी काढला. तेवढ्यातच पंकजा मुंडे यांनी तुम्ही अकाउंटला पैसे टाका असं म्हटलं आणि नागरिकांतून एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.