मुंबईचे प्रदूषण आता धोकादायक पातळीवर
मुंबई महानगर प्रदेशातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याने आता थेट मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारांवरच निर्बंध येण्याची स्थिती आली आहे. वाढत्या प्रदूषणात आरोग्य सांभाळण्यासाठी मॉर्निंग वॉक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे तसेच सकाळ-संध्याकाळ घराची दारे खिडक्या बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच प्रदूषणाचा आणखी अभ्यास करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करणे व आरोग्य राखण्यासाठी आरोग्य विभागाने 'टास्क फोर्स'ची स्थापना करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य आयुक्तांनी दिले आहेत.
वाढत्या प्रदूषणाने संतापलेल्या उच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल, कल्याण- डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांनी कठोर उपाययोजना योजण्यास सुरुवात केली आहे.