Jat Villagers on Water Problems :पाणी द्यायचं नसेल तर आम्ही कर्नाटकात जाऊ -ग्रामस्थ
सांगली: जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 हुन अधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केले आहे.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर पाऊसाआभावि खरिपाच्या पेरण्या जवळपास 100 टक्के वाया गेल्या आहेत.
पाण्याच्या टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून तसेच राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दुष्काळग्रस्तांनी केला आहे. जत तालुक्यातल्या 65 गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. जत तालुक्यातल्या संख येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी चक्री उपोषण सुरू केले आहे.
राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल, दुष्काळ जाहीर करता येत नसेल, तर आता आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून, जतच्या दुष्काळी 65 गावांना पाणी तातडीने मिळू शकते, मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे. याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप देखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे.