Pandharpur : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी ; आजपासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर 24 तास खुलं राहणार
विठुरायांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर 24 तास खुलं राहणार आहे. भाविकांना 24 तास विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात हजारो भाविक येत असतात. यावेळी मोठी गर्दी होऊन प्रत्येकाला पदस्पर्श दर्शन घेता येत नाही. त्यामुळे मंदिर समितीने प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 4 ते 22 जुलै दरम्यान विठ्ठल मंदिर चोविस तास तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
देवाचे दर्शन 24 तास खुले केल्याने आता रोज पायावर 50 हजार तर मुखदर्शनातून 50 ते 60 हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे. आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास 18 ते 20 तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या 8 ते 10 तासात देवाचे दर्शन मिळत आहे. आता आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.