Indapur Farmer: ॲमेझॉन आणि बिग बास्केटवरून शेतकऱ्यांची जांभूळ विक्री
बारामती: पांडुरंग बरळ आणि अमर बरळ अशी या उच्चशिक्षित शेतकऱ्यांची नावे आहेत. बरळ यांनी बारा वर्षांपूर्वी अडीच एकरात जांभळाची बाग फुलवली होती. मागील वर्षापर्यंत पुणे, मुंबईच्या बाजारात त्यांनी जांभूळं 70 ते 140 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. मात्र बरळ यांचे बीएससी अॅग्री झालेली उच्चशिक्षित मुले अविनाश आणि अमर यांच्या नवकल्पनेतून, त्यांनी ॲमेझॉन आणि बिग बास्केटशी करार केला. आणि ऑनलाईन जांभूळ विकण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळाला.
बरळ यांची कचरवाडीत 17 एकर शेती आहे. या शेतीत त्यांच्या डाळिंब, पेरू, शेवगा, जांभूळ, कलिंगड अशा विविध प्रकारच्या फळबागा आहेत. 13 वर्षांपूर्वी कोकण बहाडवी जातीच्या जांभूळ झाडांची त्यांनी लागवड केली होती. मागील बारा वर्षांपासून ते जांभळाचे उत्पादन घेत असून यंदा त्यांनी जवळपास सहा टन जांभळांची विक्री केली आहे. यातील दोन टन जांभळांची त्यांनी ॲमेझॉन आणि बिग बास्केटवर ऑनलाईन विक्री केली आहे.
जांभूळ नाशवंत पीक आहे. ते अधिक काळ टिकत नाही. ही फळे लवकरात लवकर विक्रीस न्यावी लागतात. या गोष्टीचा विचार करून महादेव बरळ यांच्या उच्चशिक्षित मुलांनी जांभळे ऑनलाईन विक्रीचा निर्णय घेतला आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांसमोर एका नव्या बाजारपेठेचं उदाहरण ठेवलं आहे.