नगरसेवक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
नेता अधिक मोठा व्हायला लागला की पक्षनेतृत्वाची चिंता वाढायला लागते आणि मग पक्षाकडून त्याचे पाय कापायला सुरुवात केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेत एकनाथ शिंदे यांची परिस्थिती अशीच काही सुरु होती. त्यांचे खच्चीकरण सुरु झाले होते. कोणत्याही कामांसाठी एकनाथ शिंदे यांना पुढे केले जात होते, परंतु निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होत नव्हता. फेब्रवारी महिन्यात ठाणे शहरातील काही बॅनर्समुळे चांगलीच चर्चा रंगली होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 'भावी मुख्यमंत्री' असे बॅनर ठाण्यात लागले. त्यावरुन शिवसेना नेते त्यांच्यांवर नाराज होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार होते तेव्हाही एकनाथ शिंदे यांचा एक गट भाजप सोबत जाणार होता, मात्र त्यावेळी त्यांची समजूत घालण्यात आली होती.
महाराष्ट्रात पहिल्यादा मुख्यमंत्रीपदाचा त्याग भाजपने कमी आमदार असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाच्या गळ्यात टाकली. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस राहणार नाही. आता राज्याची सूत्र एकनाथ शिंदे सांभाळणार आहेत.
शाखाप्रमुख ते मंत्री
सातार्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव. पण शिक्षणासाठी त्यांनी ठाणे गाठले आणि इथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यावर! आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेसह काही जण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आली. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. त्यानंतर दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे ते 40 दिवस ते बेल्लारी येथील तुरुंगात होते. शाखाप्रमुख ते शिवसेना नेतेपदापर्यंत आणि मंत्रीपदापर्यंत शिंदे यांचा प्रवास होता.
राजकीय प्रवास
१९९७ साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक
२००१ मध्ये ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते
२००४ मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार
२००५ मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख
२००९, २०१४ आणि २०१९ मध्ये आमदार
कार्यकर्त्यामध्ये बळकट स्थान
दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यात शिंदे यांचे योगदान मोठे आहे. ठाणे महापालिकेपासून जिल्हापरिषद, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली महापालिका, बदलापूर नगरपरिषद ते नाशिक पर्यन्त शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. या भागातील राजकरणावर त्यांची पकड आहे. तिथे शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जातो.
विरोधी पक्षनेतेपदी निवड
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे जेमतेम महिनाभर या पदावर होते. परंतु, एवढ्या अल्पावधीतही त्यांनी जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला सळो की पळो करून सोडले. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.
२०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यास उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे हे प्रमुख नाव चर्चेत होते. शिवसेना प्रमुखांनी कधी पद घेणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांचे स्थान कमी होऊ लागले. त्यांना मंत्रीपद दिले असले तरी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान नव्हते. यामुळे शिंदे यांनी आता आपला वेगळा मार्ग निवडला.