तुरुंगात जाऊ पण असे प्रकार सहन करणार नाही; डॉ.लहाने राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोललं
मुंबई : जे.जे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांमधील वाद शिगेला पोहचलेला आहे. या वादात वरिष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह तब्बल ११ डॉक्टरांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या राजीनामा नाट्यावर डॉ. लहाने यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
२८ निवासी डॉक्टरांनी तक्रार दाखल केली आहे. अधिष्ठाता यांनी डॉक्टर अशोक आनंद यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. अशोक आनंद यांनी याआधीच एका प्रकरणात माझ्यासह पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे. अशावेळी दुसऱ्या डॉक्टरांकडे प्रकरणाची सुनावणी द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मान्य न करता आमच्याविरूद्ध एकतर्फी सुनावणी घेऊन अहवाल सादर झाला. आमचे म्हणणे ऐकून न घेता थेट विरोधात निकाल दिला गेला, असे लहाने यांनी सांगितले आहे.
शिकावू डॉक्टरांना नियमानुसार आधी हिस्टरी लिहून घेण्याचे काम दिले जाते. सिम्युलेशनचे काम पुढे दिले जाते. बोट्स आयवर डॉक्टरांनी हात स्थिर करणे गरजेचे असते. त्यानंतर त्यांना कॅटरॅक्ट सेवा शिकवली जाते. तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण दिले होते. जे आरोप करत आहेत, त्यांचे पोस्टिंग जेजे रुग्णालयात नव्हते. ते सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये होते, असाही खुलासा त्यांनी केला. सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले डॉक्टर यांना शस्त्रक्रिया करायला देणे हे नियमाविरूद्ध आहे. आम्ही ट्रेन झालेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया नक्कीच करायला देतो, असे त्यांनी सांगितले.
आमच्या शस्त्रक्रिया चोरतो असे निवासी डॉक्टर बोलतात. मला एकेरी नावाने संबोधले जाते मी ३० पिढ्या घडवल्या आहेत. मी शिकवलेले डॉक्टर बाहेर शस्त्रक्रिया करत आहेत. त्यांनी केलेल्या चौकशीत आम्ही दोषी आहोत. आम्हाला जवाबच देऊ दिला नाही. मग आम्ही दोषी कसे? असा सवाल डॉ लहानेंनी उपस्थित केला आहे. आम्ही ३६ वर्षे डोळ्यांना नजर देत आलो आहोत. आमच्या डोळ्यासमोर असे प्रकार आम्ही दबावाखाली सहन करणार नाही. यापुढे आम्ही जेजे रुग्णालयात काम करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.
मी स्वतःला आरोपी समजत नाही म्हणून समोर येऊन बसलो आहे. यापुढे सेवा सुरु राहिल. पण पुन्हा जेजे रुग्णालयात पाय ठेवणार नाही. रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही. रघुनाथ नेत्रालय येथे दर आठवड्यात दोन दिवस मोफत शस्त्रक्रिया करणारे आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. अधिष्ठाता यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई कराल. विद्यार्थी आमच्यासाठी दोषी नाहीत. त्यांना आम्ही माफ केले. त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही मदत करू, असेही डॉ. लहाने यांनी म्हंटले आहे.