BJP Vs Congress | चंद्रपूरच्या कोसंबीत भाजप - काँग्रेसमध्ये मोठा राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

चंद्रपूरच्या कोसंबीत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, खुर्च्या फेकल्या, एक जखमी, मुनगंटीवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Published by :
shweta walge

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात कोसंबी येथे रात्री भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. या राड्यात एक जण जखमी झाला आहे. सुधीर मुनगंटीवारांनी रात्री सभा घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

काल जाहीर प्रचार संपल्यानंतर रात्री बारा वाजताच्या सुमारास कोसंबी येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे सभा घेत असल्याची माहिती काँग्रेस उमेदवाराला मिळाली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह उमेदवार संतोष रावत तातडीने कोसंबी पोचले. त्यांनी सभा थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही गटात हाणामारी झाली.मुनगंटीवार आणि रावत यांच्यात शाब्दिक चकमक झाली. व्हीडिओ काढणाऱ्या रावत यांच्या चालकाला मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. ही मारहाण केली जात असताना सोडवण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या विजय चिमड्यालवार यांनाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुर्च्या फेकल्या. हा राडा होताच मुनगंटीवार निघून गेले. तर काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी आचार संहिता भंग आणि कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी कार्यकर्त्यांसह मूल पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन केले. दरम्यान, याप्रकरणी अजून गुन्हा दाखल झालेला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com