Satish Uke ED Raid | नागपूरात नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड
नागपुरातील (nagpur) वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ED Raid) आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी ईडीचे पथक सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले आहेत. मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळं ते अधिक चर्चेत आले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप झाला होता. या दोन फौजदारी गुन्ह्यांमध्ये एक अब्रुनुकसानीचा, तर दुसरा फसवणुकीचा खटला होता. फडणवीसांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.