‘मोदीजी, तुम्ही किती घाबरता?’ टि्वटर प्रकरणावरून काँग्रेसचा टोला
गुरुवारी सकाळी ट्विटरनं काँग्रेसच्या अजून काही नेतेमंडळींची अकाऊंट्स लॉक केल्यानंतर आता थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य अकाऊंट ट्विटर इंडियानं लॉक केलं आहे. यासाठी नियमांचा भंग केल्याचं कारण ट्विटरकडून दिलं गेल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मात्र थेट मोदी सरकरावरच निशाणा साधण्यात येत असून ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या दबावाखाली हे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
दरम्यान, अशा कोणत्याही गोष्टीमुळे लोकांसाठी आवाज उठवण्यापासून पक्षाला कुणी थांबवू शकणार नाही, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. आपल्या इस्ट्राग्राम हँडलवरून काँग्रेसनं ही पोस्ट केली आहे. काँग्रेसनं इन्स्टाग्राम पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यावर पोस्टमध्ये "मोदीजी, तुम्ही किती घाबरता? काँग्रेस पक्षानं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. फक्त सत्य, अहिंसा आणि लोकांच्या इच्छेच्या जोरावर हे झालं. आम्ही तेव्हाही जिंकलो होतो, आम्ही पुन्हा जिंकू", असं या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.