ट्विट करत प्रियांका गांधींचा मोदींना सवाल, म्हणाली…
लखीमपूर खीरी येथील घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडत वाहनांचा ताफा निघून गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधील रोष आणखी वाढल्यामुळे उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यातच पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
सध्या पोलीस या व्हिडीओची पुष्टी करत नाहीत. व्हिडीओत शेतकऱ्यांना चिरडणारी पहिली गाडी थार जीप आहे तर दुसरी टोयाटो फॉर्च्युनर होती. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह विरोधकांनी हा व्हिडीओ शेअर करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीनीही एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. हा व्हीडिओ ट्वीट करत प्रियांकांनी "नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डर वा FIR शिवाय गेल्या 28 तासांपासून अटकेत ठेवले आहे. अन्नदात्याला चिरडणाऱ्या या व्यक्तीला अजून अटक झालेली नाही. असे का?" म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रियंका गांधींना हिंमत ठेवून मागे न हटण्यास सांगितले आहे. तसेच "प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू" असे देखील राहुल गांधींनी म्हटले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांना लखीमपूर खीरीला भेट देण्याची परवानगी उत्तर प्रदेश सरकारने नाकारली, तर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्यासह काही काँग्रेस आमदारांना हरियाणा- उत्तरप्रदेश सीमेवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी रात्री व्हॉट्सअॅप आणि फेसबुक बंद पडल्याने हा व्हीडिओ तितकासा पसरला नव्हता. पण मंगळवार 5 ऑक्टोबर सकाळपासून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर लखीमपूर खिरीमधली इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.