टूलकिट प्रकरण: दिशा रवीला एक दिवसाची पोलीस कोठडी
दिल्ली शेतकरी आंदोलनानंतर या टूलकिट प्रकरणात जास्तच तापत चालले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांना पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीची एक दिवसाची कोठडी मिळाली आहे. दिशा रवीची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांना ही कोठडी मिळाली आहे. दिल्ली पोलिसांना सहआरोपीसोबत दिशाची चौकशी करता येईल. टूलकिट प्रकरणात दिशा रवी एक आरोपी आहे. ४ फेब्रुवारी रोजी ट्विटर टूलकिट प्रकरणीदिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरुमधील राहत्या घरातून दिल्ली पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी न्यायालयाने दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, उद्या मंगळवारी न्यायालय निर्णय देणार आहे. याच प्रकरणात सहआरोपी असलेले शांतनू मुळूक आणि निकिता जेकब यांना अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे.
काय आहे टूलकिट प्रकरण…
मागील दोन महिन्यांना पासून नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासह इंटरनेट सेवा बंद केली होती. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूलकिट ट्विट केले होते. मात्र, काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आली. याच प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुगल आणि अन्य बड्या सोशल मीडिया कंपन्यांना अधिक माहिती मागवत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात या टूलकिटचा संबंध खलिस्तानी संघटनेशी असल्याचे समोर आले आहे.