ऐनवेळी तालिबानने सरकारचा शपथविधी केला रद्द

ऐनवेळी तालिबानने सरकारचा शपथविधी केला रद्द

Published by :
Published on

दोन दशकानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता स्थापन झाली. आज अफगाणिस्तानमधील तालिबानच्या हंगामी सरकारचा शपथविधी होणार होता. अमेरिकेवरील कुप्रसिद्ध 9-11 च्या हल्ल्याला आजच्याच दिवशी 20 वर्षे पूर्ण होत असल्याने तालिबानने आजच्याच दिवशी नवीन हंगामी सरकारचा शपथविधी करण्याचे योजले होते. मात्र अगदी ऐनवेळी तालिबानने हा शपथविधी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

देशापुढे अत्यंत बिकट आर्थिक संकट असल्यामुळे काटकसर करण्यासाठी तालिबानने हा शपथविधी रद्द करण्याचा निर्णय घेतला, असल्याचे समजते आहे. तर असा भपकेबाज शपथविधी केल्यामुळे तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळू शकणार नाही, असे वाटल्यामुळे या हंगामी सरकारमधील काही गटांनीच या शपथविधीच्या सोहळ्याला विरोध केला असल्याचेही समजते आहे.

या शपथविधीच्या सोहळ्यासाठी तालिबानने चीन, तुर्की, पाकिस्तान, कतार, भारत आणि अगदी अमेरिकेलाही निमंत्रण देण्यात आले होते. तालिबानने आपल्या हंगामी सरकारची रचना यापूर्वीच जाहीर केली आहे. या सरकारने आपले कामही यापूर्वीच सुरू केले आहे. त्यामुळे अशा कोणत्याही आंतराष्ट्रीय मान्यतेची गरजच नाही, असे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इमानुल्लाह समानगनी याने सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com