कोरोनाची दुसरी लाट जास्त खतरनाक; ICMRने सांगितलं कारण
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,48,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,04,099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,93,82,642 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचं दिसत असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याचं कारण सांगितलं आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचं प्रमाण वाढलं असावं असं आयसीएमआरने म्हटलं आहे. तरुणांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी माहिती दिली आहे.
"पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यामध्ये वयात जास्त फरक असल्याचं दिसत नाही. प्रतिकूल परिणामासाठी 40 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात" असं म्हटलं आहे.