लसीकरण मोहीम : 45 वर्षांवरील व्यक्तींना मिळणार ‘या’ तारखेपासून डोस
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच केंद्र सरकारने देशभरात लसीकरणाचा पुढला टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.
येत्या 1 एप्रिलपासून आता 45 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लस घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती जावडेकर यांनी दिली. आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 85 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी 80 लाख लोकांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. तसेच, गेल्या 24 तासांमध्ये विक्रमी 32 लाख 54 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 45 आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.