क्लीन-अप मार्शल्सवर महापौरांनी केले स्पष्ट…
महाराष्ट्राप्रमाणेच मुंबईमध्येही कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मास्क न घातलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने क्लिन-अप मार्शलची नेमणूक केली आहे. शहरातील विविध ठिकाणी हे मार्शल्स मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत असतात. मात्र काही ठिकाणी मार्शलच्या मार्फत सर्वसामान्यांची लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मुंबईकरांकडून पैसा उकळला जात असल्याचे एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले होते. या पार्श्वभूमीवर लोकांकडून पैसे उकळणाऱ्या या मार्शल्सवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात सोमवारी बैठक पार पडणार असून संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलेल्या व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन महापौरांनी दिले. कायद्याची दहशत सर्वांवर असावी, अशी भूमिका पेडणेकर यांनी मांडली.