Tamil Nadu Elections 2021 : माजी केंद्रीय मंत्र्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, प्रचार करण्यास 48 तासांची बंदी!
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना द्रमुक पक्षाला धक्का बसला आहे. द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली आहे. आयोगानं राजा यांना 48 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राजा यांनी ही कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगानं यापूर्वी राजा यांना या प्रकरणात नोटीस बजावली होती. राजा यांनी त्याला 30 मार्च रोजी उत्तर पाठवले. पण आयोगानं त्यांचा युक्तीवाद फेटाळला होता. आयोगानं राजा यांना पुन्हा उत्तर देण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिली होती. त्यावर राजा यांनी आयोगाकडं अधिक मुदतीची मागणी केली होती. आयोगानं राजा यांची ही मागणी फेटाळत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
द्रमुक पक्षाचे खासदार असलेल्या ए. राजा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हंटले होते की, ' ते चुकीच्या मार्गानं जन्मले आहेत. ए. राजाने द्रमुक पक्षाचे प्रमुख स्टॅलिन यांची प्रशंसा करत त्यांचा जन्म योग्य मार्गानं झाला असून पलानीस्वामी यांचा जन्म चुकीच्या मार्गानं झाला आहे,' अशी टीका राजा यांनी केली होती.