तालिबानमध्ये बदल झालेला नाही, भारत आव्हानांना सामोरा जाण्यास सज्ज – रावत
२० वर्षानंतर तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान आहे. यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरा जाण्यासाठी भारत सज्ज आहे, असे भारताचे चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ बिपिन रावत (सीडीएस बिपिन रावत) म्हणाले. ते इंडिया यूएस पार्टनरशिप सिक्युरिंग ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी या चर्चासत्रात बोलत होते.
अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या बातम्या वेदनादायी आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. तालिबानमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे यावरुन जगातील अनेक देशांची मनस्थिती द्विधा झाली आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही असे तालिबान सांगत असले तरी अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या बातम्या तालिबानचा दावा वारंवार फेटाळत आहेत.
सहकारी बदलले असले तरी तालिबानमध्ये बदल झालेला नाही. अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या बातम्या यावर शिक्कामोर्तब करत आहेत. भारताने तालिबान अफगाणिस्तानच्या ताब्यात जाणार हे गृहित धरुन आधीपासूनच निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी पुरेशी तयारी केली आहे.
हिंद महासागर आणि प्रशांत महासागर (पॅसिफिक महासागर) या ठिकाणी निर्माण झालेली आव्हाने आणि अफगाणिस्तानमधील आव्हाने यांना एकाच नजरेतून बघणे योग्य होणार नाही. हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. दोन्ही मुद्दे सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील आहेत. पण दोन्ही मुद्दे स्वतंत्र आणि समांतर आहेत. या मुद्यांची सरमिसळ होण्याची शक्यता नाही. ज्या पद्धतीने भारत देशातील दहशतवादाचा बीमोड करत आहे त्याच पद्धतीने अफगाणिस्तानमधील प्रश्नही शांतपणे सोडवले जाऊ शकतात. अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारताच्या सुरक्षेवर वाईट परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे हे आमचे काम आहे आणि आम्ही ते करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहोत; असे सीडीएस बिपिन रावत म्हणाले.