डेलकर प्रकरणाची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यापाठोपाठ आता हे प्रकरण लोकसभेच्या अध्यक्षांकडे गेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (10 मार्च) प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ओम बिर्ला यांना पत्र देत सुप्रिया सुळे यांनी मोहन डेलकर यांच्या आरोपांची विशेषाधिकार समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली.
डेलकर यांनी मुंबईच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्यांनी 14 पानांचे पत्र लिहिेले होते. तोच संदर्भ देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, सात वेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर यांनी लोकसभेत केलेल्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांच्यावर असलेल्या प्रचंड मानसिक तणावाविषयी आणि दादरा-नगर हवेलीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर टाकल्या जात असलेल्या दबावाविषयी सांगितले होते. त्यामुळे हे प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवावे, अशी विनंती करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.