‘धनंजय मुंडे आणि माझ्यावर सिनेमा काढल्यास सुपर डुपर चालेल’
शिवशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी आता थेट कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North By Election) रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतची घोषणा करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरातून केलीय. यावेळी करुणा शर्मा यांनी, महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल', असं वक्तव्य केले आहे.
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत करुणा शर्मा यांनी येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. 'राजकारण कसं चालतं हे मी गेली 25 वर्षापासून पाहत आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल', असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद मागील काही दिवसात प्रकर्षाने पुढे आलाय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण परळीतून निवडणूक लढवणार असल्याचंही करुणा शर्मा यांनी यापूर्वी म्हटलंय. मागील वर्षी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांचं मूळ नाव करुणा शर्मा असून त्या मूळ मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. या आरोपानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी समाजमाध्यमांवर करुणा शर्मा आणि आपले संबंध असून ही बाब कुटुंबियांनाही अवगत असल्याची कबूली दिली होती.