”माझ्या निधनाची इतकी कसली घाई”, निधनाच्या ट्विटवर सुमित्रा महाजन म्हणाल्या….
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचे ट्विट आणि बातम्या गुरुवारी मध्यरात्री प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र या संदर्भातील ट्विट डिलीट करण्यात आले तर काहींनी बातम्या मागे घेतल्या. कारण हे वृत्त खोटे होते. या सर्व प्रकरणावर सुमित्रा महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुमित्रा महाजन यांचं निधन झालं असल्याची बातमी गुरुवारी रात्री वेगाने पसरली. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सगळीकडे त्यांच्या निधनाची चर्चा सुरु झाली. फक्त शशी थरुरच नाही तर सुप्रिया सुळे यांच्यासहित अनेकांनी ट्विट केलं होतं. तसंच काही प्रसारमाध्यमांनीही वृत्त दिलं होतं. पण नंतर हे वृत्त खोटं असल्याचं लक्षात येताच ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र यामुळे सुमित्रा महाजन चांगल्याच संतापल्या आहेत.
माझं निधन झाल्याचं जाहीर करण्यात इतकी कसली घाई लागली होती अशी विचारणा सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. "इंदूर प्रशासनाकडून माहितीची पडताळणी न करताच काही न्यूज चॅनेल माझं निधन झाल्याचं वृत्त कसं काय चालवू शकतात? माझ्या नातेवाईकाने शशी थरुर यांना ट्विटरला वृत्त खोटं असल्याचं सांगितलं. पण पुष्टी करण्याआधीच जाहीर करण्याची इतकी कसली घाई होती?," अशी विचारणा सुमित्रा महाजन यांनी केली आहे.