मोदी सरकारमधील मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप, सुब्रमण्यम स्वामींचा दावा
भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारमधील मंत्री, तसेच देशातील अनेक न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केला आहे. याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे देखील फोन टॅप होत असल्याचं स्वामी यांनी म्हटलं.
सुब्रमण्यम स्वामी हे कायमच त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. पण यावेळी थेट केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंगबाबत भाष्य केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी वॉशिंग्टन पोस्टने एक अहवाल जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलेली असल्याचं सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.
"मोदी सरकारमधील मंत्री, आरएसएसचे नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्याचं काम इस्राईलस्थित स्पायवेअर कंपनी पेगाससला देण्यात आल्याबाबतचा एक अहवाल आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनच्या माध्यमातून प्रकाशित केला जाणार असल्याची जोरदार अफवा सध्या सोशल मीडियात आहे", असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.