उद्यापासून देशभरात लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात..
येत्या १ मार्चपासून देशभरात लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होतीय. यामध्ये साठ वर्षांपरील त्याचप्रमाणे ४५ वर्षांवरील सहआजार असणाऱ्या व्यक्तींना लस टोचण्यात येणार आहे. याच वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रादुर्भावाचा मोठा धोका असल्याने दुसऱ्या टप्प्यात या ज्येष्ठांना प्राधान्य देण्यात आले आहे.
१६ जानेवारीपासून देशभरात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यानंतर मोठ्या प्रमाणात लसीकरण राबवण्यात आले. यामध्ये फ्रन्टलाईन वर्कर्सचा समावेश होता.
दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांतूनही करोना लस देण्यात येणार असून तिच्या प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल, तर सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी सांगितले. लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून (१ मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात वृद्ध आणि सहआजारांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. ४५ ते ५९ वयोगटातील हृदयविकार, पक्षाघात, दहा वर्षांपासून मधुमेह असलेले, उच्चरक्तदाबाचे रुग्ण, डायलीसीसवरील रुग्ण, कर्करुग्ण आदी २० प्रकारच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल.
११ लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
मुंबईत सध्या साधारण १ लाख २१ हजार आरोग्य आणि सुमारे ८७ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत सुमारे ११ लाख ४० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून यात सुमारे ६ लाख ५२ हजार आरोग्य कर्मचारी आणि सुमारे ३ लाख ५७ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.