पुणे : कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन संकृस्ती प्रतिष्ठानच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीगिरांचे मानधन ६ हजार वरून २० हजार, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजार वरून २० हजार तर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी व रुस्तुम ए हिंद या कुस्तीगिरांचे मानधन ४ हजार वरून १५ हजार इतके करण्यात येईल. तसेच कुस्तीगिरांचे निवृत्ती वेतन अडीच हजारांवरून साडे सात हजार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी आश्वासित केले. कुस्ती स्पर्धांमध्ये यशस्वी कुस्तीगीरांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.