कुस्तीपटू सुशील कुमारला अंतरिम जामीन मंजूर
सागर धनखर हत्या प्रकरणातील आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार याला जामीन मिळाला असून तिहार तुरुंगामधून त्याची सुटका झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने सुशीलला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुशीलची पत्नी आजारी असून तिच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे, त्यामुळे न्यायालयाने सुशीलला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबर पर्यंत सुशीलाला कुटुंबाला वेळ देता येणार आहे.
जमीन मिळाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सुशीलला गेट क्रमांक 4 ऐवजी अन्य गेटमधून तुरुंगाबाहेर सोडण्यात आले. सुशीलच्या सुटकेचे आदेश शनिवारीच तिहार तुरुंगामध्ये आले होते. शुक्रवारी सुशीलला अंतरिम जामीन मंजूर झाला. सुशीलच्या पत्नीची 7 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुशीलच्या सुरक्षेसाठी आणि त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी दोन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी सुशीलला 12 नोव्हेंबरपर्यंत जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. सरकारी वकिलांनी सुशीलला जामीन देण्यास विरोध केला असला तरी, कुटुंबाची परिस्थिती पाहता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरोपीची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची स्थिती पाहता जामीन मंजूर करण्यात येत आहे. यासोबतच जामिनाची मुदत संपताच म्हणजेच 13 नोव्हेंबरला सुशीलला कारागृह अधीक्षकांसमोर शरण जाण्याची सूचना दिली आहे. 4 मे 2021 च्या रात्री सागर आणि सोनू यांना छत्रसाल स्टेडियममध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला तर सोनू महल हा गंभीर जखमी झाला. सुशील हा सागर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.