Rohit Sharma: रोहित शर्माची शानदार खेळी! फायनलमध्ये मैदानात उतरताच रचला विक्रम
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. फलंदाजीसाठी भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. यावेळी रोहित शर्माने शानदार खेळी केली. रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. त्याचे अर्धशतक हुकले, पण त्याने ऑसी गोलंदाजाची धुलाई केली.
रोहित शर्माने नवा विक्रम केला
रोहित शर्मा या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे.
रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. या विक्रमात रोहितने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच यांना मागे टाकले आहे.