पत्नी भाजपची उमेदवार तर बहीण काँग्रेसची स्टार प्रचारक, रवींद्र जाडेजा दुविधेत
देशात सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, ही निवडणुक आणखी एका गोष्टीमुळे आणखी चर्चेत आली आहे. त्याचे कारण असे आहे की, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात जामनगर उत्तरमधून क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाला भाजपने उमेदवारी दिली आहे.
कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या काँग्रेसने त्याच मतदार संघाची जवाबदारी रवींद्र जाडेजाची बहीण नैना जाडेजा यांना स्टार प्रचारक म्हणून दिली आहे. रीवाबा यांच्याकडं कामांची यादी आहे. पण ती सर्व कामं तेव्हाच पूर्ण होतील, जेव्हा त्या आमदार होतील. जेव्हा त्या आपल्या नणंदेला प्रचारात मागं टाकतील. जिथं नैना यांच्या वहिनी म्हणजेच रीवाबा जाडेजा भाजपच्या उमेदवार आहेत. तिथंच नैना जाडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करतायेत. त्यामुळे जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष सुरु झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा आणि बहीण नैना जाडेजा वेगवेगळ्या पक्षात आहेत. नणंद आणि भावजय या दोघींमध्ये भांडण झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाडेजाच्या पत्नी रिवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच जाडेजाची बहीण नैना देखील काँग्रेसमध्ये सामील झाली होती. नयना काँग्रेसमध्ये आल्यापासून त्या खूप सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे.