Virat Kohli : विराट कोहलीला राग अनावर; विकेट गेल्यावर बॅटने खुर्ची उडवली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याचे रागावर नियंत्रण नसल्याने तो अनेकदा टीकेचा धनी ठरला आहे. असाच एक प्रकार बुधवारच्या सामन्यात घडला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कोहलीला फटकारण्यात आले आहे.
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना रंगला. 29 चेंडूत अवघ्या 33 धावा केल्यानंतर विराट कोहली बाद झाला. त्यामुळे संतापलेल्या कोहलीने पॅव्हेलियनकडे परतताना आरसीबीच्या डगआऊटमध्ये असलेली खुर्ची बॅटने उडवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील क्रिकेटपटूही त्याच्याकडे पाहत राहिले.
IPL प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कोहलीला आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या नियमांतर्गत क्रिकेट उपकरणांशिवाय मैदानातील साहित्याचं नुकसान करणं अशा बाबींचा समावेश होतो. त्यानंतर मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी यांनी आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराट कोहलीला चांगलंच फटकारलं.
बंगळुरुचा हैदराबादवर विजय
शाहबाज अहमदने एका ओव्हरमध्ये घेतलेल्या 3 विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर 6 धावांनी विजय मिळवला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या.