रॉजर फेडररच्या अंतिम सामन्यानंतर विराटने केली भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा तुमच्यासाठी सहकारी रडतात...
टेनिस जगताला अलविदा करणारा स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू रॉजर फेडरर शुक्रवारी (23 सप्टेंबर) अखेरचा सामना खेळला. यावेळी सहकारी स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल त्याच्यासोबत होता. या सामन्यात विशेष म्हणजे फेडररला कारकिर्दीतील शेवटचा सामना जिंकता आला नाही. सामन्यानंतर फेडररला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. यावेळी फेडरर-नदाल या दोघांनाही अश्रू अनावर झाले. त्या दोघांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोवरच विराट कोहलीने एक भावुक पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाला विराट पोस्टमध्ये?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होम सीरिज खेळणाऱ्या कोहलीने फेडरर आणि नदालचा एक भावनिक फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कुणाला वाटले की दोन प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्येही एकमेकांबद्दल अशा भावना आहेत. हेच खेळाचे सौंदर्य आहे. हा माझ्यासाठी आतापर्यंतच्या खेळातील सर्वोत्तम फोटोंपैकी एक आहे. जेव्हा तुमचे सहकारी तुमच्यासाठी रडतात, तेव्हा तुम्ही समजू शकता की देवानं तुम्हाला ही प्रतिभा का दिली आहे?" अशी भावनिक पोस्ट त्या दोघांसाठी विराटने शेअर केली आहे.
फेडररची इमोशनल पोस्ट
फेडररनं याच महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच लेव्हर कप त्याच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल असंही त्यानं स्पष्ट केलं होतं. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं होतं की, "मी 24 वर्षाच्या कारकिर्दीत 1500 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. आता वेळ आली आहे निरोप घेण्याची." फेडररनं फ्रेंच ओपनमध्ये 21वं ग्रँड स्लॅम जिंकलं, हे त्याच्या टेनिस कारकिर्दीतील अखेरचं ग्रँड स्लॅम ठरलं.