नवी दिल्ली : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार उफाळला. यामध्ये 127 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे समजत आहे. इंडोनेशियन पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. एएनआयच्या वृत्तसंस्थेनुसार ही घटना पूर्व जावा येथील घडली आहे.
पर्स्बाया सुराबाया आणि अरेमा एफसी यांच्यातील सामना इंडोनेशियाच्या पूर्व जावा येथील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात अरेमा एफसी संघाचा पराभव झाला. संघाच्या पराभवानंतर संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसून हाणामारी सुरू केली. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती मिळताच पोलीस आणि इंडोनेशियन नॅशनल आर्म्ड फोर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि खेळाडूंना सुरक्षितपणे मैदानाबाहेर काढले.
पूर्व जावा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेत 34 जणांचा मैदानातच मृत्यू झाला होता. तर, उर्वरित ९३ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हिंसाचारात दोन पोलिसांचाही मृत्यू झाला आहे.