राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा : विनेश फोगटची ‘धाकड’ कामगिरी
महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. रवि दहिया आणि पूजा गहलोत यांनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०२२ मध्ये कुस्ती प्रकारात चमकदार कामगिरी केली असून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. रवी आणि विनेशच्या आधी दीपक पुनिया, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी बर्मिंगहॅममध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकावले आहे.
दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगटने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली आहे. विनेशने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. तिने ५३ किलो फ्रीस्टाइलमध्ये श्रीलंकेच्या चामोदय केशानीचा पराभव केला. विनेशने हा सामना ४-० असा जिंकला. तिने २०१४ ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४८ किलो आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये ५० किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तीन पदकांची कमाई करणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. याशिवाय, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
टोकियो ओलंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या रवि दहियाने ५७ किलो गटात फायनलमध्ये नायजेरियाच्या वेल्सन एबीकेवेनिमो याला हरवून सुवर्ण पदकावर नाव कोरले. हरियाणातील सोनीपतमधील नहारी गावात जन्मलेला रवी दहिया सध्या दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये शिक्षण संचालक आहे.