Tokyo 2020 | मनिका बत्रावरही कारवाई होणार
भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राला ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण आता मनिकाला या पराभवानंतर आणखी एक धक्का बसला आहे. टेबल टेनिस महासंघाने तिच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यामुळे तिच्यासमोर आता मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
मनिकाकडून भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या अपेक्षा होत्या. पण मनिकाला अपयश आले व पदकाच्या आशा धुळीला मिळाल्या. मनिका जेव्हा खेळत होती तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकांची मदत घेतली नव्हती. यावेळी तिचे खासगी प्रशिक्षक टोकियोमध्ये दाखल झाले होते. पण त्यांना खेळाच्या ठिकाणी आयोजकांनी प्रवेश दिला नाही. भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक हे सौम्यदीप रॉय आहेत. रॉय हे एकच असे प्रशिक्षक होते की ज्यांना टेबल टेनिसच्या खेळाडूंबरोबर जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
पण मनिका आपले खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांना घेऊन टोकियो येथे गेली होती. पण सन्मय यांना मनिकाबरोबर सराव करण्याची संधी दिली नाही आणि त्याचबरोबर जिथे स्पर्धा होणार होती तिथेही त्यांनी आयोजकांनी प्रवेश नाकारला होता. त्यानंतर मनिकाने स्पर्धा सुरू असताना राष्ट्रीय प्रशिक्षक रॉय यांची मदत नाकारली होती. मनिकाने केलेल्या या गैरवर्तनामुळे तिच्यावर कारवाई होणार आहे.