IND vs ZIM: पाचव्या सामन्यातही टीम इंडियाचा दणदणीत विजय; मालिका खिशात घालून झिम्बाब्वेचा उडवला धुव्वा
India vs Zimbabwe T-20 Series Latest Update: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये रंगला. या सामन्यात टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत झिम्बाब्वेला १६८ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघ १२५ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात ४२ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वे विरोधात झालेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालकेत भारताने ४-१ ने आघाडी घेत मालिका विजय मिळवला. संजू सॅमसनच्या अर्धशतकी (५८) खेळीच्या जोरावर आणि मुकेश कुमारने घेतलेल्या ४ विकेट्समुळं भारतानं झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली.
आजच्या पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं २० षटकांत ६ विकेट्स गमावून १६७ धावांपर्यंत मजल मारली होती. झिम्बाब्वेसाठी डिऑन मेयर्सने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. सलामीवीर मधीवरेला भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर झिम्बाब्वेचे इतर सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले.
भारतासाठी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने ४ विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर शिवम दुबे २ विकेट घेण्यात यशस्वी झाला. संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी साकारली. संजूने ४५ चेंडूत ५८ धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. रियान परागने २४ चेंडूत २२ धावा केल्या. तर शिवम दुबेनं १२ चेंडूत २६ धावा कुटल्या. यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझा, रिचर्ड आणि ब्रँडणने प्रत्येकी १ विकेट घेतली. तर मुझारबानीला २ विकेट घेण्यात यश मिळालं.