कसोटी मालिकेत टीम इंडियाचा दबदबा! अश्विनने पंजा उघडला, धरमशालेत इंग्लंडचा दारुण पराभव
इंग्लंड विरोधात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने ४-१ ने आघाडी घेत दबदबा कायम ठेवला. पाचव्या कसोटीतही इंग्लंडला पराभवाची धूळ चारणाऱ्या भरताने धरमशालेत विजयी झेंडा फडकवला. रोहित शर्मा, शुबमन गिलने शतकी खेळी केल्यानं भारताला पाचव्या कसोटी सामन्यातही विजयाचा नारळ फोडता आला. भारताने एक इनिंग आणि ६४ धावांनी हा कसोटी सामना जिंकला. रविचंद्रन आश्विनने फिरकीचा भेदक मारा करून पाच विकेट्स घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात ५७.४ षटकांमध्ये सर्वबाद २१८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने १२४.१ षटकात सर्वबाद ४७७ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडची पुरती दमछाक केली. रविचंद्रन आश्विनच्या फिरकीच्या जादूने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करुन भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा आख्खा संघ ४८. १ षटकात १९५ धावांवर गारद झाला.
भारताच्या गोलंदाजांनी धरमाशालेच्या मैदानात अप्रतिम कामगिरी केली. अश्विनने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करून चमकदार कामगिरी केली. तसंच बुमराहने दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या कुलदीपला इंग्लंडच्या दुसऱ्या डावात दोन विकेट्स मिळाल्या. तर रविंद्र जडेजाला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. जो रुटला धावांचा सूर गवसल्याने तो शतकाच्या जवळ पोहोचला होता. परंतु, कुलदीपच्या फिरकीपुढं त्याने नांगी टाकली आणि रुट ८४ धावांवर बाद झाला.