टीम इंडियात हार्दिक पंड्याची भूमिका बदलणार? कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला...
Suryakumar Yadav On Hardik Pandya : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची सुरुवात उद्या शनिवारी २७ जुलैपासून होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा टी-२० चा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्याच्या संघातील भूमिकेबाबत मोठं विधान केलं आहे.
पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमारला दिल्यानंतर हार्दिकच्या भूमिकेत काही बदल होईल का? या प्रश्नाचं उत्तर देतना सूर्यकुमार यादव म्हणाला, हार्दिक आमच्या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. तो संघासाठी पूर्वीप्रमाणेच भूमिका पार पाडणार आहे. हार्दिक वर्ल्डकपमध्ये ज्या फॉर्ममध्ये होता, तशीच कामगिरी तो पुन्हा करेन, याची आम्हाला आशा आहे.
"वरिष्ठ खेळाडूंची जागा भरणं कठीण"
टी-२० वर्ल्डकप २०२४ संपल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजानं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टी-२० मध्ये या तिनही खेळाडूंची जागा भरणं कठीण असेल, असं सूर्यकुमार म्हणाला. काही युवा खेळाडूंचा संघात समावेश झाला आहे. ज्यांनी आयपीएल आणि घरेलू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
हे खेळाडू पुढेही चांगली कामगिरी करतील, याचा मला विश्वास आहे, असंही सूर्यकुमारनं म्हटलं आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला भारताचा टी-२० चा कर्णधार बनवण्यात आला आहे. सूर्यकुमारने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात झालेल्या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. त्याच्या कॅप्टन्सीत भारताने ७ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय संपादन केलं आहे.