प्रसिद्ध क्रिकेटपटू वासिम जाफरवर गंभीर आरोप
लोकशाही न्यूज नेटवर्क | भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संघ निवडीत जाफरवर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहेत. मात्र हे आरोप वासिम जाफरने फेटाळून लावले आहेत.
उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिम जाफरवर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादानंतर जाफरने उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. हस्तक्षेप आणि पक्षपाती निवडसमिती ही कारणे त्यांनी राजीनामा देताना दिली. दरम्यान या वादानंतर वासिम जाफर यांनी आरोप फेटाळून लावला.
उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव माहिम वर्मा, माझ्यावर मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मला प्रचंड दु:ख झाले आहे, असे वासिम जाफरने सांगितले. "संघ निवडीत जातीयवादाचा अँगल आणणे, खूप दु:खद आहे" असे जाफर म्हणाले.
डेहराडूनला शिबिर असताना दोन ते तीन शुक्रवार मौलवी आले होते. पण मी त्यांना बोलावले नव्हते. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी इक्बाल अब्दुल्लाने माझी आणि संघाच्या व्यवस्थापकांची परवानगी घेतली होती" असे जाफर म्हणाले. संघाच्या प्रशिक्षणा दरम्यान मौलवींना आणल्याचा आरोपही फेटाळून लावला.
रणजी करंडक स्पर्धेत आपल्या फलंदाजीने दबदबा निर्माण करणाऱ्या वासिम जाफर यांनी भारतासाठी ३१ कसोटी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वासिम जाफर हे एक मोठे नाव आहे.