ICC Ranking: टीम इंडियाच्या खेळाडूंचा धमाका! ऋतुराज गायकवाडची टॉप-१० मध्ये एन्ट्री, अभिषेक शर्माही चमकला
ICC T20 Rankings Update : आयसीसीने रँकिंगबाबत साप्ताहिक अपडेट जारी केलं आहे. मागच्या आठवड्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेली टीम इंडिया अॅक्शन मोडमध्ये दिसली. या दोन्ही संघांमध्ये टी-२० सामन्यांची लढत झाली. या सामन्यांमध्ये काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे या खेळाडूंना आयसीसी रँकिंगमध्ये बढती मिळाली आहे. तर जे खेळाडू सामने खेळले नाहीत किंवा ज्या खेळाडूंचा स्क्वॉडमध्ये समावेश नव्हता, त्या खेळाडूंचं नुकसान झालं आहे. फलंदाजीत ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माला फायदा झाला आहे. तर यशस्वी जैस्वालने सामना खेळला नसल्यानं त्यालाही नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे.
ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माने फलंदाजीच्या रँकिंगमध्ये केली कमाल
आयसीसी फलंदाजांच्या टी-२० रँकिंगमध्ये टॉप-१० मध्ये सर्वात मोठा बदल ऋतुराज गायकवाडच्या रुपात झाला आहे. ऋतुराजने झिम्बाब्वे विरोधात ४७ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली होती. या इनिंगमुळे त्याला १३ स्थानांचा फायदा झाला आहे. त्यामुळे तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तसच अभिषेक शर्माने त्याच्या करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात वादळी शतक ठोकलं. त्यामुळे अभिषेक शर्मानेही रँकिंगमध्ये प्रवेश केला आहे. तो ७५ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर रिंकू सिंग चार स्थानांचा फायदा घेत ३९ व्या स्थानावर पोहोचला आहे.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाहेर राहणाऱ्या यशस्वी जैस्वालचं रँकिंगमध्ये नुकसान झालं आहे. त्याची तीन स्थानांवरून घसरण झाली असून तो एडम मार्करमसोबत संयुक्तपणे दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटनं २५ स्थानांवरून उडी घेत तो ९६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. बेनेटने टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात १५ चेंडूत २२ आणि दुसऱ्या सामन्यात ९ चेंडूत २६ धावा केल्या होत्या.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना ६ जुलैला खेळवण्यात आला होता. यामध्ये मेजबान संघाने १३ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करून झिम्बाब्वेचा १०० धावांनी दारुण पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाने या मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. तर तिसरा टी-२० सामना आज बुधवारी १० जुलैला रंगणार आहे.