IPL 2024 RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून केला पराभव

IPL 2024 RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून केला पराभव

विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रंगपंचमीच्या दिवशी त्यांच्या घरच्या मैदानावर विजयाचे रंग पसरवले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रंगपंचमीच्या दिवशी त्यांच्या घरच्या मैदानावर विजयाचे रंग पसरवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव करून या आयपीएल हंगामातील पहिला विजय नोंदवला. पंजाब किंग्जने दिलेले 177 धावांचे लक्ष्य आरसीबीने 4 चेंडू बाकी असताना 178 धावा करून पूर्ण केले. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना झाला पण शेवटी विजय आरसीबीकडे गेला. विराट कोहली आरसीबीचा सर्वाधिक 77 धावा करणारा फलंदाज होता, त्याने आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिक (8 चेंडूत नाबाद 28 धावा) आणि महिपाल लोमरोर (8 चेंडूत नाबाद 17 धावा) यांच्या शानदार खेळीमुळे आरसीबीने पंजाब किंग्जवर 4 गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवला.

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात RCB ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. त्याने 37 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने प्रभसिमरन सिंग (25) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली.

हे दोघे बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने 17, जितेश शर्मा 27 आणि सॅम कुरन 23 धावा करत पंजाबला 150 जवळ नेले. त्यानंतर शशांक सिंगने नाबाद 21 धावा करत पंजाबला 176 धावांपर्यंत पोहचवले. RCB कडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 तर यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. इतर गोलंदाजांनी निराशा केली.

दरम्यान, आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कमबॅक केलं आहे. आरसीबीनं चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जला 4 विकेटनं पराभूत केलं. दिनेश कार्तिकनं अखेरच्या 10 बॉलमध्ये 28 धावा करुन आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com