मॉर्गन, धोनी नव्हे रोहित शर्माचा राहणार बोलबाला! 'या' विक्रमाला गवसणी घालून हिटमॅननं रचला इतिहास
Rohit Sharma Most Sixes Record As Skipper : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. ही कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला आहे. श्रीलंके विरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर २३६ षटकारांची नोंद होती. परंतु, रोहितने या सामन्यात तिसरा षटकार ठोकून इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मोर्गनला मागे टाकलं. त्यामुळे रोहित अव्वल स्थानावर पोहोचला.
आता रोहित शर्माच्या नावावर २३४ षटकारांची नोंद आहे. त्यानंतर इऑन मॉर्गनच्या नावाची नोंद आहे. मॉर्गनने कर्णधार म्हणून १८० इनिंगमध्ये २३३ षटकार ठोकले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने कर्णधार म्हणून ३३० इनिंगमध्ये २११ षटकार मारले आहेत.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी
श्रीलंके विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय संपादन करता आलं नाही. परंतु, रोहित शर्माने अप्रतिम फलंदाजी करून ४७ चेंडूत १२३.४० च्या स्ट्राईक रेटने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. रोहित शर्माची ही ५६ वी अर्धशतकी खेळी आहे.
कोलंबोत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर श्रीलंकेनं निर्धारित ५० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावून २३० धावा केल्या. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघ ४७.५ षटकांत २३० धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे पहिला सामना अनिर्णित राहिला आणि दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आले.